- Contact : Uday Gulabrao Shelke Foundation - Pimpri Jalsen, Tal, Parner Dist. Ahmednagar 414302
२४ जुलै १९७७ रोजी एका उच्च विचारांच्या व्यक्तीचा जन्म झाला, ज्याने अनेकांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. BA, LLB करून त्यांनी स्वत:चं आयुष्य उंचीवर नेलं आणि ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर शेतकरी आणि तरुणांसाठी प्रगतीचा मार्ग तयार केला. त्यांची साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी होती. त्यांना लोकांमध्ये राहायला, रमायला आवडत असे. गावातील आपल्या माणसांप्रती त्यांना प्रचंड ओढ आणि आदर होता. त्यांची नाळ ग्रामीण भागाशी अगदी घट्ट बांधली गेली होती आणि ते उच्च शिक्षित असून सुध्दा त्यांचे पाय जमीनीवरच होते.
त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाला गंभीरपणे घेतलं. त्यांचं काम अचूक आणि पारदर्शक करण्याचं कौशल्य होतं. त्यांना कामाची आवड होती आणि निवडलेल्या क्षेत्राचा आदर होता. स्वभावाने मनमोकळे असले तरी कामाच्या वेळी शिस्तबद्ध आणि कठोर असायचे. वडील सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी ग्रामीण तरुणांची उन्नती आणि उच्च शिक्षणासाठी जीवन समर्पित केले होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून, ॲड.उदय गुलाबराव शेळके यांनी समाजासाठी अनेक उपक्रमांतून उत्कृष्ट कामगिरी बजावली.
सहकार आणि बँकिंग क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय गुलाबराव शेळके हे समाजकार्यासाठी नेहमीच पुढे असायचे. देशातील सहकार बँकांमध्ये मानाने अग्रगण्य बँक म्हणुन त्यांच्या बँकेची गणना केली जाते. त्यांना मिळालेल्या पदाचा त्यांनी इतरांच्या भल्यासाठी उपयोग केला. अनेक लोकांना आर्थिक सहाय्य, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तरुणांना व्यवसाय क्षेत्रात यायला प्रोत्साहन दिलं. लोकांना त्यांच्या कामातून प्रेरणा आणि लोकांच्या चेहऱ्यावरील आनंदाने ॲड. उदय गुलाबराव शेळके यांना समाधान मिळायचं.
वयाच्या २७ व्या वर्षापासून त्यांनी बँकेत संचालक म्हणून प्रवास सुरु केला ते चेअरमनपर्यंत. बँकेकडे त्यांनी नेहमी आपलं घर म्हणून पाहिले. वडील सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांचे संस्कार आणि तत्व त्यांनी त्यांच्या कृतीतून कायम जपण्याचा प्रयत्न केला. सर्वांना विश्वासात घेऊन कामं केली. बँकेमधील छोट्या ते मोठ्या पदांवरील सर्व कर्मचा-यांशी त्यांनी विश्वासाचं नातं तयार करुन बँकेच्या विकासाकडे आणि आधुनिकतेकडे लक्ष दिले. म्हणूनच आजच्या तारखेला देखील ही बँक देशातील सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते.
ॲड.उदय गुलाबराव शेळके हे दिवंगत सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांचे चिरंजीव... त्यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांनी त्यांच्या समाजकार्यात त्यांना मोलाची साथ दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँक या दोन बँकांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती.
काही वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पारनेर सोसायटी मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी उदय गुलाबराव शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
अत्यंत कमी वयात सहकार क्षेत्रात काम करतानाच राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून आपले वेगळे असे स्वतंत्र वलय निर्माण करणारे ॲड.उदय गुलाबराव शेळके हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि एक प्रगल्भ विचार असलेलं व्यक्तीमत्व म्हणूनच ते अनेकांच्या स्मरणात, कृतीत आणि विचारात राहतील हे नक्की.